ब्रेल लीपी विषयी

अंधांसाठी 'सर्पस्पर्श' पुस्तकाचे वरदान 

 


डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे. 
मी मुळात सर्पमित्र. सापांविषयी आपल्या समाजात किती अज्ञान आहे हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. हे अज्ञान दूर करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सर्पमित्र सतत धडपडत असतात. दृष्टी असलेली एखादी व्यक्ती सापांपासून आपल्याला असलेला धोका ओळखू शकते. सावध होऊ शकते. चुकून साप चावलाच तर किमान आवश्यक प्रथमोपचार घेऊ शकते, तसे आसपासच्या लोकांना सांगू शकते पण अंधांचे काय? साप चावल्याचे त्यांना कसे समजणार? त्यानंतर नेमके काय केले पाहिजे याची माहिती त्याला कशी मिळणार? सापच नव्हे तर कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत अंधांनी काय करावे? कसा जीव वाचवावा? 
या सगळ्यावर एकच उपाय आम्हाला दिसला तो म्हणजे “ब्रेल” लिपीत याविषयीची माहिती देणारे पुस्तक काढणे आणि त्याचा प्रसार करणे. यादृष्टीने जागतिक अंधविकास शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पुढे सरसावलो. अंधांसाठी “सर्पस्पर्श”, “आपत्कालीन व्यवस्थापन” अशा दोन ब्रेल बुक्सची निर्मिती करुन अंध बांधवांना एक शैक्षणिक दालन खुले करुन दिले. एखाद्या अंध बांधवाला चुकून जर “सर्पदंश” झालाच तर त्याने स्वत:चे प्रथमोपचार स्वत: कसे करावयाचे त्याविषयीची समग्र शास्त्रीय माहिती तसेच सर्पविषयक असलेल्या अंधश्रध्दा/ गैरसमजुतीविषयी याची माहिती विस्तृतपणे दिली आहे. महाराष्ट्रातील १०० अंधशाळांना ती पुस्तके शैक्षणिक भेट म्हणून पाठविण्यात आली आहेत. एकाने तर आम्हाला सांगितले की, एखाद्या डोळस व्यक्तीला जर साप चावला तर आम्ही जाऊन त्याचे प्राण वाचवू शकतो.
“आपत्कालीन व्यवस्थापन” या ३६ पानी पुस्तकाची निर्मिती देखील खूप उपयुक्त ठरली. या ब्रेलबुकमध्ये मानव निर्मित आपत्ती म्हणजेच आग, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले, तसेच नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप, महापूर, झंझावात, त्सुनामी, चक्रीवादळ, ओला किंवा सुका दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारांचा मारा या विषयाची माहिती ब्रेलमध्ये दिली आहे. १ फुट बाय १ फुट आकाराचे हे मोठे पुस्तक १०० अंध शाळांना शैक्षणिक भेट म्हणून लुई ब्रेल यांच्या २००४ व्या जयंती दिवसानिमित्त देण्यात आले आहे. या ब्रेलबुकमध्ये अंधव्यक्तींच्या मनातील कुतूहल आणि आजकाल उच्चारले जाणारे शब्द AK47, AK56 इत्यादी विषयांची माहिती त्यांना स्पर्शाने समजेल अशा स्पर्शीय आकृत्या काढून दिली गेली आहे.
अनेक अंधमित्रांना त्याचा फायदा झाल्याचे त्यांनी आम्हाला कळविल्याने आमचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला.
आमचे “स्वावलंबी अंधमित्र” हे पुस्तक देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या पुस्तकात अंधबांधवांनी नियमित योगासने करुन आपले शरीर आणि मन सुदृढ कसे ठेवावे या विषयी स्पर्शीय आकृत्यांसह माहिती दिली आहे. पद्मासनात कसे बसावे ? सूर्यनमस्कार इत्यादी विषयी समग्र माहिती दिलेली आहे. तसेच या पुस्तकात महाराष्ट्र शासन, भारत सरकारतर्फे अंध बांधवांसाठीच्या बस, एस.टी., ट्रेन, विमान प्रवासातील सोई-सवलती तसेच त्याविषयीचा सरकारी अध्यादेश (G.R.) बद्दल माहिती दिलेली असून अंध-कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, ब्रोलर, अंधासाठी विशेष घड्याळे, प्लेईंग कार्ड्स तसेच अंधांसाठी बुध्दिबळपट याविषयी माहिती दिलेली आहे. 
आज देशात २००१ च्या जनगणनेनुसार एकूण अंध व्यक्तींची संख्या १,०६,३४,८८९ एवढी प्रचंड असून महाराष्ट्रात ५,८०,९३० एवढी आहे. या अंध बांधवाना सहानुभूती नको तर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात असा, कुठलेही काम करीत असा, अंध बांधवांना आपण कशी कदत करु शकतो ते पाहा. खालील मार्गांनी आपण हे काम करू शकता.1.  अपंग, मूकध्वनी, मतिमंद तसेच अंध बांधवांसाठी विविध प्रकारची शिबिरे आयोजित करावीत.
1 .आमची संस्था अशा आयोजनात निश्चित मदत करेन.
2.  अंध बांधवांना बस, एस.टी., रेल्वेमध्ये चढण्यास-उतरण्यास तसेच रस्ता क्रॉस करताना रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रस्त्यावर असताना मदत करा.
3.  आठवड्यातून एकदा तरी अंध बांधवांच्या घरी जाऊन त्यांना पत्र लिहिण्यास / वाचण्यास मदत करा.
4.  १० वी, ११वी, १२वी च्या परीक्षेसाठी अंधांना “रायटर” म्हणून जा.
5.  कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यासाठी मदत करा. बँकींगच्या परिक्षेसाठी “रायटर” म्हणून जा.
6.  मृत्युनंतर नेत्रदान हे सर्वात मोठे पुण्यदान आहे. तुमचे डोळे दुसऱ्यांना दृष्टी देऊ शकते.

No comments:

Post a Comment