आता २१ प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे
Published On: Sep 17 2018
दैनिक पुढारी,
पुणे : प्रतिनिधी
आतापर्यंत राज्यात केवळ सहा प्रकारच्या दिव्यांगांना दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, आता केंद्र शासनाच्या ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ची अंमलबजावणी राज्यात सुरू केली आहे. त्यानुसार या अधिनियमात नव्याने समाविष्ट केलेल्या 15 प्रकारातील दिव्यांगांनाही दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. त्यासाठी तपासणी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयातून करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पूर्वीच्या कायद्यानुसार दृष्टीदोष, कर्णबधीरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता आणि बहुदिव्यांगता हे सहा दिव्यांग प्रकार आहेत. केंद्र शासनाने 28 डिसेंबर 2016 रोजी ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ हा नवीन कायदा संमत केला आहे. या कायद्यानुसार आणखी 15 दिव्यांग प्रकारांचा नव्याने समावेश करत एकूण 21 प्रकारच्या दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदुचा पक्षाघात, स्नायुंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्न्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, थॅलेस्मिया, हिमोफेलिया, सिकल सेल डिसीज, दृष्टीक्षीणता आणि कुष्ठरोग या प्रकारांचा समावेश नव्याने केलेला आहे. केंद्र शासनाचा नवीन कायदा मंजूर झाला तरी प्रमाणपत्रे मिळत नव्हती. मात्र आता सर्व प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी तो ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच जिल्ह्यातील संस्थेमार्फत मुल्यमापन करून देण्यात येणार आहेत. मात्र त्या प्रकारचे तज्ज्ञ त्या जिल्ह्यात उपलब्ध नसतील तर जवळच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, शासकीय किंवा महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालये-रुग्णालयांतून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावरून देखील अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी ही लागणार कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज हा अर्जदाराने किंवा तो सक्षम नसल्यास कायदेशीर पालकांना अर्ज करता येतील. त्यासाठी ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, दोन पासपोर्ट फोटो, सादर करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी एसएडीएम प्रणालीद्वारे दिलेले दिव्यांग प्रमाणपत्रही वैध राहणार आहेत.
No comments:
Post a Comment